Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

निळे - हिरवे शेवाळ (जिवाणू खत) वापरण्याची पद्धत

शेताची चिखलणी करुन नत्र खताचा पहिला हप्ता देऊन झाल्यावर सदृढ व जोमदार रोपांची पुनर्लागण करावी. भाताच्या पुनर्लागणीच्यावेळी खाचरातील पाणी माती मिश्रित गढूळ झालेले असते. ते पाणी स्वच्छ झाल्यावर व मातीचे कण खाली बसल्यावर म्हणजे पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी २० किलो निळे-हिरवे शेवाळ प्रती हेक्टर संपूर्ण शेतावर सारखे पडेल या पध्दतीने फोकून टाकावे. नंतर पाणी ढवळू नये. म्हणजे टाकलेल्या निळया हिरव्या शेवाळावर मातीचे कण बसणार नाहीत.
शेवाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश पाण्यामधून जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचेल व शेवाळाची वाढ स्वच्छ पाण्यात सूर्यप्रकाशात भरपूर होईल. साधारणतः तीन आठवडयात शेवाळाची वाढ जमिनीच्या पृष्ठभागावर झालेली दिसेल, तसेच ही वाढ पाण्यावरसुध्दा तरंगताना दिसून येईल. अशा पध्दतीने तयार झालेले शेवाळ पेशीमध्ये स्थिर केलेला नत्र रोपाला पुरविला जातो त्यामुळे भात रोपांची वाढ जोमदार होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. त्याचप्रमाणे जवळ जवळ २५ टक्के नत्र खताची बचत होते.
निळे-हिरवे शेवाळ व नत्र खत या दोहोंच्या वापरामुळे उत्पादनात निव्वळ नत्र खतांच्या वापराने येणाऱ्या उत्पादनापेक्षा लक्षणीय वाढ होते. ही वाढ सरासरी २०० किलोपासून २५० किलोपर्यंत प्रती हेक्टर असते. निव्वळ नत्र खत वापरण्याऐवजी नत्र खत व निळे-हिरवे शेवाळ वापरणे हे उत्पादन वाढीचे दृष्टिने अत्यंत फायदेशीर ठरले आहे.
भात शेतीपासून जास्तीत जास्त उत्पादन हवे असल्यास नत्र खताच्या प्रमाणित मात्रेबरोबरच २० किलो शेवाळ प्रती हेक्टर वापरणे आवश्यक आहे. २० किलो शेवाळाची किंमत फक्त ४०/- रुपये असल्याने उत्पादन खर्चातही फारशी वाढ होत नाही, परंतु भात उत्पादनात २ ते ३ क्विंटलची वाढ होते. शेवाळामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब ०.२ ते ०.३ टक्के वाढतो. तसेच एकूण नत्र ०.०१ ते ०.०२ टक्के वाढतो. त्यामुळे जमिनीचा पेात सुधारतो. त्याचा फायदा पुढील पिकाला चांगला मिळून उत्पादनात वाढ होते.
भाताच्या भरघोस उत्पादनासाठी नत्र खताची प्रमाणित मात्रा द्यावी. पुनर्लागण केल्यानंतर ८ ते १० दिवसांनी २० किलो शेवाळ प्रती हेक्टर फोकून द्यावे, म्हणजे हे शेवाळ पाण्यात जमिनीच्या पृष्ठभागावर सूर्यप्रकाशात चांगले वाढून कार्यक्षमपणे नत्र स्थिरीकरणाचे कार्य करेल, त्यायोगे उत्पादनात निव्वळ नत्र खतापेक्षा लक्षणीय वाढ दिसून येईल.

निळे हिरवे शेवाळ वाढविण्याची पध्दत:
सर्वसाधाराणपणे २ x १ x ०.२ मी. आकाराचे वाफे तयार करुन त्यावर २०० मायक्रॉन जाडीचा पॉलीथिन पेपर टाकावा. पॉलिथिन पेपरवर साधारणतः ८ ते १० किलो बारीक माती पसरावी. त्यामध्ये २५ ग्रॅम कार्बोफ्युरॉन मिसळावे. तसेच ७ ते १० सें.मी. पाण्याची पातळी ठेवून त्यामध्ये २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट, २ ग्रॅम सोडियम मॉलीबडेट, ४० ग्रॅम फेरस सल्फेट, ५० ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड यांचे मिश्रण टाकून आतील माती ढवळावी.
माती तळाशी बसल्यावर शांत पाण्यात निळे हिरवे शेवाळाचे परीक्षा नळीतील किंवा प्रयोगशाळा/मध्यवर्ती केंद्र यांनी पुरविलेले मूलभूत बियाणे छिडकावे. साधारणपणे ८ ते १० दिवसात शेवाळाची भरपूर वाढ होते व त्याचा पाण्यावर चांगला थर जमते.
भरपूर वाढ झाल्यावर पाणी आटू द्यावे. सुकलेली माती गोळा करुन ती सावलीत वाळवावी. सुकलेली शेवाळ पापडी/शेवाळ मिश्रित माती प्लॅस्टिक पिशवी किंवा कापडी पिशव्यामंध्ये गोळा करावी.
या शेवाळ पापडीचा / शेवाळ मिश्रित मातीचा पुढील पिकासाठी शेवाळाचे बियाणे म्हणून उपयोग करता येतो. हे बियाणे भात लावणीनंतर ८ ते १० दिवसांनी भात खाचरामध्ये २० किलो या प्रमाणात दर हेक्टरी वापरावे.
वरील पध्दती व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या सोयीनुसार पत्र्याच्या ट्रेमध्ये (चौकोनी आकाराच्या) किंवा सिमेंटच्या स्लॅबवर वरील पध्दत वापरुन शेवाळाचे बियाणे तयार करता येते. शेवाळ वाढविताना डासांचा किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास बंदोबस्तासाठी कीटकनाशकांचा वापर करावा.

Source:http://www.mahaagri.gov.in/

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com