Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

चिकूवरील फायटोप्थोरा रोगकारक बुरशीचे नियंत्रण करण्याच्या पद्धती

फायटोप्थोरा या बुरशीच्या प्रसाराची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत,
पावसाळ्यात जमिनीवर पडलेल्या फळांवर बुरशी धागे व असंख्य बीजे तयार होतात.
सतत पडणाऱ्या पावसामुळे वाढलेली सापेक्ष आर्द्रता ९० ते १०० टक्के आणि तापमान २२ ते २७ अंश सेल्सिअस हे वातावरण बुरशीच्या वाढीस व प्रसारास अनुकूल ठरते.
झाडांवरील फळांच्या देठावर, फळांवर बुरशी धागे व बीजे यांचा प्रसार पावसाच्या पाण्यामार्फत होतो.
रोगट फळांवर पावसाचे थेंब पडल्याने उडणारे तुषार, सोसाट्याच्या वाऱ्यामार्फत वाहून नेलेले शिंतोडे यांच्यामार्फत प्रसार एका झाडावरून दुसऱ्या झाडावर होतो.
या बुरशीची काही लक्षणे पुढील प्रमाणे आहेत,
1. बुरशीची वाढ पहिल्यांदा कळी अवस्थेमध्ये किंवा छोट्या फळांवर दिसते.
2. बुरशीने प्रादुर्भावग्रस्त फळे सुकलेली दिसतात.
3. चिकूच्या बागेत सुकलेल्या फळांची गळ झालेली निदर्शनास येते.

आता यावर नियंत्रण कसे करावे? त्यासाठी काही उपाय करण्याची गरज असते, त्या उपायांमध्ये पहिला उपाय म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पहिली फवारणी बोर्डो मिश्रणाची (१ टक्का) करावी.
पावसाळ्यानंतर पुढील दोन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (रेडी मिक्स) बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बुरशीनाशक वाहून न जाता पानांवर आणि फळांवर चिकटून रहावे यासाठी फवारणीच्या वेळेस बुरशीनाशकाच्या द्रावणात एक मि.लि. सर्फेक्टंट मिसळून फवारणी करावी.
तसेच चिकू झाडाच्या जमिनीला टेकलेल्या आणि एकमेकांत मिसळलेल्या अनुत्पादक फांद्यांची छाटणी करावी. त्यामुळे बागेमध्ये सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील.
बागेच्या सभोवती तसेच बागेमधील भारी जमिनीत साचलेल्या पाण्याचा निचरा जागोजागी चर खोदून करावा. गळून पडलेली फळे, कळ्या, पाने झाडांचे अवशेष इत्यादी जाळून नष्ट करावेत.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com