Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

रुंद वरंबा सरी यंत्र म्हणजेच बीबीएफ द्वारे आंतरमशागतीचे नियोजन

रुंद वरंबा सरी पद्धत ही पद्धत अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या तसेच जलसंधारण दृष्टीने उपयुक्त आहे. रुंद वरंबा सरी पद्धत ही विशेषतः भारी तसेच मध्यम ते भारी जमिनीमध्ये अतिशय उपयुक्त आहे. या पद्धतीमध्ये जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळी वरंब्यावर येतील यानुसार नियोजन करून वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सऱ्या काढण्यात येतात. यासाठी रुंद वरंबा सरी यंत्र म्हणजेच बीबीएफ उपयुक्त आहे.

या यंत्राच्या मदतीने एकाच वेळी रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे केली जातात. यामध्ये पेरणीचे फण आणि दोन फाळ यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते त्याच बरोबर सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते.

बीबीएफ ही पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने हीपद्धत उपयोगी ठरते. या पद्धतीमुळे २५ टक्के उत्पादनात वाढ दिसून येते तसेच सर्वसाधारणपणे २० ते २७ टक्क्यांपर्यंत जलसंधारण होते.

तण नियंत्रणाच्या व आंतरमशागतीच्या दृष्टीने ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राचा वापर करता येतो. यामध्ये पेरणीचे फण काढून तेथे आंतरमशागत आणि तण नियंत्रणासाठी ‘व्ही` आकाराची पास बसविता येते. हे पास पिकाच्या दोन ओळीमध्ये बसवावे लागतात. तसेच सरीमध्ये रिजर ठेवून आंतरमशागत होते, याशिवाय स्वतंत्र आंतरमशागत यंत्र वापरता येते. तसेच ट्रॅक्टरचलित आंतरमशागत यंत्राचा वापर आंतरमशागत आणि तण नियंत्रणाच्या दृष्टीने बीबीएफ पद्धतीमध्ये करता येतो, फक्त यासाठी इंग्रजी ‘व्ही` आकाराच्या पास वापराव्यात.

रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये पिकाच्या ओळीनुसार ‘व्ही` पासची संख्या ठेवता येते. बाजारात सर्वसाधारणपणे तीन ओळींसाठी तीन पास उपलब्ध असलेले अवजार उपलब्ध आहे. पण आपण आपल्या गरजेनुसार पासाची संख्या वाढवू शकतो.

‘व्ही’ आकाराच्या पासमुळे त्या स्वयंचलितपणे स्वच्छ होतात तसेच त्यामध्ये गवत अडकत नाही. कसळ पास वापरल्या तर त्यात गवत अडकते कारण त्या आडव्या असतात आणि यामध्ये गवत अवजारामध्ये थांबवून पास स्वच्छ कराव्या लागतात, परंतू तसे ‘व्ही` आकाराच्या पासमध्ये होत नाही.

या अवजारामध्ये सऱ्यांमध्ये फाळ ठेवून आंतरमशागत होते, तसेच सऱ्यामध्ये तणही प्रभावीपणे काढता येते. यामध्ये रुंद वरंब्यावर पिकाच्या किती ओळी आहेत, त्याप्रमाणे व्ही पात्यांची संख्या ठेवता येते. गरजेनुसार असे अवजार बनविता येते.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com