Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

परीक्षा न देता कृषिसेवक बनण्याची संधी.

नागपूर : राज्यात कृषी विभाग लवकरच ७३० पद भरणार आहे. कृषी सेवकांच्या भरतीत घोळ झाल्यानंतर आता दहावी आणि पदवीतील गुणांचा विचार करून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. परीक्षा न घेता थेट गुणांवर आधारित निवड करण्याची प्रक्रिया अलीकडच्या काळात पहिल्यांदाच होत आहे, हे विशेष.

कृषी विभागाने २९ डिसेंबर २०१५ रोजी कृषी सेवक पदासाठी जाहिरात प्रकाशित केली होती. ६ ऑगस्ट २०१६ रोजी परीक्षा घेण्यात आली. मात्र, निवड समितीला भरतीत घोळ लक्षात येताच २० जानेवारी २०१७ रोजी निवड यादी रद्द करण्यात आली.

अमरावती, नागपूर केंद्रावर गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या प्राथमिक भरती प्रक्रियेतच निवड समितीला घोळ झाल्याचे लक्षात आले होते. त्यावरून गोंधळ निर्माण झाला होता. यासंदर्भात निवड समितीकडे तक्रार करण्यात आली. समितीने चौकशी केली असता घोळ झाल्याचे लक्षात आले होते. हा वाद अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसले. त्यानंतर भरती प्रक्रिया लांबणीवर पडली.

अखेर आता कृषी विभागाला भरतीचा मुहूर्त सापडला आहे. कृषी सहायकांची पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरली जातात. कृषी पदविका किंवा पदवीधारण करणाऱ्या उमेदवारांना गुणांच्या आधारावर भरती करण्यात येणार आहे. गुणांच्या आधारावर निवड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच ‘ग्रीन सिग्नल’ दिला. सामान्य प्रशासन विभागाला भरतीच्या सूचना दिलेल्या आहेत. येत्या महिन्यात कागदपत्रांची पडताळणी करून निवड यादी तयार करण्यात येणार आहे.

२९ डिसेंबर २०१५ च्या जाहिरातीनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांनाच संधी मिळणार आहे. यात दहावी आणि कृषी पदवी किंवा पदविका परीक्षेत मिळालेल्या गुणांचा विचार करण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षांच्या गुणांची बेरीज करून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. पदवी आणि पदविका, अशा दोन्ही विषयांची प्रमाणपत्रे असतील, त्यावेळी कोणत्याही अभ्यासक्रमात जास्त टक्केवारी असलेल्याला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

जर दोन उमेदवारांचे गुण समान असल्यास वयोमर्यादेनुसार निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांनी पहिल्यांदा ऑनलाइन अर्ज सादर करताना दिलेली मूळ माहिती आणि सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी कृषी सहसंचालकांनी करावी, अशा सूचना सर्व आठ कृषी विभागांना सरकारने दिल्या आहेत.

Source: http://maharashtratimes.indiatimes.com

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com