Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

कुक्कुटपालन विकासासाठी राज्यात ‘स्वयंम’ प्रकल्प राबविण्यास मान्यता

राज्याच्या ग्रामीण भागांत परिसातील कुक्कुटपालनास प्रोत्साहन देण्यासह आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यांतील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यासोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी कुटुंबांसाठी स्वयंरोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने पुढील दोन वर्षांसाठी कुक्कुटपालनाचा ‘स्वयंम्’ प्रकल्प राबविण्यासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

राज्यातील ठाणे, पालघर व रायगड, पुणे, नाशिक, अहमदनगर, नंदूरबार, जळगाव, धुळे, अमरावती व यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड अशा १६ जिल्ह्यांत ‘स्वयम्’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या जिल्ह्यांतील एकूण १०४ एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात खासगी पक्षी संगोपन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक युनिटमध्ये ४१७ लाभधारक असतील. या प्रकल्पांतर्गत एकूण ४३ हजार ३६८ कुटुंबांना लाभ मिळेल.

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यांतील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत मदर युनिटच्या माध्यमातून सरकारी अथवा खासगी कुक्कुटपालन क्षेत्रातून एकदिवसीय देशी सुधारित जातीची पिल्ले प्राप्त करून त्यांचे चार आठवड्यांपर्यंत संगोपन केले जाईल.

स्थानिक आदिवासी लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यासह अशा स्वरूपाचा लाभ हा आधार क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. राज्य सरकारकडील पूर्वीचे १६ कुक्कुट विकासगट आणि कृषी विज्ञान केंद्रेदेखील मदर युनिट म्हणून काम करू शकतील. या प्रकल्पाचा एकूण खर्च २२ कोटी ५५ लाख इतका असेल. मदर युनिटधारक हा स्थानिक व आदिवासी प्रवर्गातून मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत इतर प्रवर्गातून निवडण्यात येणार आहे.

Source: http://maharashtratimes.indiatimes.com

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com